मुंबई - मुंबई पोलीस दलाला भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे खादीला काळिमा लागला आहे. खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या एका मागोमाग एक आणखी काही घटना पुढे आल्यानंतर पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांनी लाचखोरांविरोधात आता कडक पाऊले उचलली आहेत. या पुढे कुठल्याही अधिकाऱ्याला लाच स्विकारताना पकडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता. त्याला थेट बडतर्फ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
वर्षाची सुरूवातच मुंबई पोलिसांची वाईट झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांचा पारा चांगलाच वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर खात्यातून भ्रष्टाचार मुक्तीसाठी त्यांनी यापुढे लाच घेणाऱ्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचे सांगितले. या पूर्वी लाच घेताना पकडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले जायचे. त्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली जात असे. निलंबित अधिकाऱ्याला सेवेतील अर्धा पगार ही मिळायचा. खात्यातील भ्रष्टाचार मूळापासून उपटून काढण्यासाठी जैयसवाल यांनी लाच घेणाऱ्यांवर आता थेट बडतर्फची कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.