भंडारा : विद्यार्थ्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी) देण्यासाठी पालकाकडून लाच घेणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपीकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून तिघानाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्याध्यापक खेमराज मुरलीधर वासनिक (५१), सहाय्यक शिक्षक राजेश छत्रपती गजभिये (४४) आणि लिपीक सतीश श्यामलाल बिसेन (४८) अशी लाचखोरांची नावे असून ते सिहोरा येथील महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. सातव्या वर्गाचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एका पालकाला मुख्याध्यापक वासनिक आणि लिपीक बिसेन यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडी अंती अडीच हजार घेण्याचे ठरले. मात्र यासंदर्भात पालकाने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन गुरुवारी सिहाेरा येथे सापळा रचण्यात आाल. सायंकाळी अडीच हजाराची रक्कम सहाय्यक शिक्षक राजेश गजभिये यांनी स्विकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मुख्याध्यापक व लिपीकाच्या सांगण्यावरुन त्याने ही लाच स्विकारल्याचे पुढे आले. या तिघांनाही ताब्यात घेवून सिहोरा पोलीस ठाणे गाठले. तेथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.