कल्याण: कल्याणचे तहसिलदार, केडीएमसीचा कनिष्ठ अभियंता असे अधिकारी एका पाठोपाठ लाचेच्या हव्यासापोटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकल्याच्या घटना नुकत्याच घडल्या असताना लाचखोरीचे सत्र अद्याप सुरूच असल्याचे सोमवारी झालेल्या आणखीन एका कारवाईतून समोर आले आहे. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना कार्यालयातच 1 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी भुसंपादनाचे काम सध्या कल्याण तालुक्यात सुरू आहे. या महामार्गात बाधित होणा-या जमिनींचे मुल्यमापन करून अहवाल देण्याचे कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. दरम्यान अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता भानुशाली यांनी अहवाल देण्यासाठी तक्रारदार बांधकाम बाधिताकडून 9 सप्टेंबरला पडताळणी दरम्यान चार लाख रूपये लाचेच्या स्वरूपात स्विकारले. दरम्यान आणखीन 1 लाख रूपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे भानुशाली यांनी संबंधित बाधिताला सांगितले. अखेर याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कल्याण शासकीय विश्रमगृहाच्या आवारात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा लावला आणि 1 लाखांची रोकड स्विकारणा-या भानुशाली यांना रंगेहाथ अटक केली. महामार्गाच्या बांधणीत बाधित होणा-यांना योग्य तो मोबदला मिळत नाही असे आरोप, तक्रारी सर्रासपणो होत असताना दुसरीकडे मुल्यमापनाचा अहवाल देण्यासाठी बाधितांकडून लाचेची मागणी करण्याची अधिका-याची कृती चर्चेचा विषय ठरली आहे.