शेगाव - हक्कसोडपत्र नोंदण्यासाठी ठरविण्यात आलेल्या पाच हजार रुपयांपैकी एक हजार रुपयांची लाच घेताना येथील एका मुद्रांक विक्रेत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी ५ वाजताच्या दरम्यान येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेता कार्यालयात घडली.
यासंदर्भात शहरातीलच एका ३२ वर्षीय इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने सापळा रचून कारवाई केली. यात मुद्रांक विकेता सुधीर परशुराम बावसकर (४७) यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरोपी हा मुद्रांक विक्रेता असून त्यांनी तक्रारदार यांचे हक्कसोडपत्र नोंदविण्यासाठी दुय्यम निबंधक यांना देणेसाठी तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष ५००० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीने पंचासमक्ष १००० रूपयांची लाच रक्कम स्विकारल्याने आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुय्यम निबंधक यांची पडताळणी करण्यात आली असून त्यांचेकडून लाच मागणी झालेली नसल्याचे यावेळी खुलासा करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पंजाबराव डोंगरदिवे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र,अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी- पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव, बुलडाणा, पोना विलास साखरे, पोना मोहमद रिजवान, पोशि विजय मेहेत्रे, पोशि जगदीश पवार व चालक पोशि मधुकर रगड यांनी कारवाई केली.