ठाणे - जप्तीमधील टेम्पो सोडविण्यासाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अंगद मुरलीधर मुंडे (31) या मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये हा प्रकार आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यातील संबंधित तक्रारदार यांच्या मुलाच्या नावाने एक टेम्पो आहे. वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी हा टेम्पो डायघर वाहतूक पोलिसांनी जप्त केला होता. दरम्यान, हा टेम्पो सोडण्यासाठी मुंब्रा वाहतूक उपविभागात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई मुंडे याने 11 सप्टेंबर 2019 रोजी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर एसीबी पथकाने 14 सप्टेंबर रोजी याप्रकरणी पडताळणी केली. यात तथ्यता आढळल्याने पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी मुंढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.