बिहारच्या गयामध्ये महेंद्र कुमार नावाच्या तरुणाची मोठी फसवणूक झाली आहे. महेंद्रच्या मोबाईलवर एक कॉल आला ज्यामध्ये तू लग्न कर असं सांगितलं गेलं. ३० वर्षीय महेंद्र कुमारचं अद्याप लग्न झालं नसल्यामुळे त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. २२ वर्षीय ज्युली कुमारीसोबत त्याचं लग्न होणार असल्याचं सांगितलं. याच दरम्यान लग्नाची तारीख ठरली. यानंतर ज्युलीही महेंद्रशी प्रेमाने बोलू लागली.
कोर्टामध्ये २५ सप्टेंबर रोजी लग्न करण्यात आलं. पण कोर्टात झालेलं हे लग्न खोट असल्याचं महेंद्र कुमारला माहितीच नव्हतं. तो विचार करत होता की आता आपलं लग्न झालं असून आनंदात राहायचं. कोर्ट मॅरेजनंतर नवरीच्या सांगण्यावरून तो शहरातील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेला आणि तेथे त्याने नऊ हजार रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या. तसेच काही वस्तू खरेदी करण्यासाठी नवरीने २० हजार रुपये घेतले. यानंतर नवरीने सामान आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.
या प्रकरणाबाबत नवरदेव महेंद्र कुमारने पोलिसांत धाव घेतली. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी वधू ज्युली कुमार, परैया येथील रंजीत पासवान, नरेश मांझी, खटकचक येथील रहिवासी लाला आणि बाराचट्टी येथील समुंद्री देवी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक
याप्रकरणी एसएसपी आशिष भारती यांनी शुक्रवारी सांगितलं की, ८ तासांनंतर आरोपी नरेश मांझी, रणजीत पासवान आणि समुंद्री देवी यांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान, ज्युली कुमारी आणि लाला फरार आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. महेंद्र कुमार हा उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील रहिवासी आहे.