राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात एका लग्नाची गोष्ट चांगलीच चवीने चर्चिली जात आहे. एका तरुणासोबत धोका झाला आहे. बागोडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या तरुणाने १७ लाख रुपये देऊन २३ वर्षांच्या तरुणीशी मोठ्या थाटामाटात विवाह केला. घरी घेऊन आला, परंतू ही नववधू केवळ १५ दिवसच त्याच्यासोबत नांदली, आता हा तरुण डोक्याला हात लावून बसला आहे.
पोलिसांनी आता लग्न जुळविणाऱ्या दलालाला अटक केली आहे. नववधू १५ दिवसांनी फरार झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये हे लग्न झाले होते. हरिसिंहने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्न लावण्यासाठी दलालाने त्याच्याकडून १७ लाख रुपये घेतले होते. १५ दिवस नांदून नववधू माहेरी गेली होती, परंतू ती परत आलीच नाही. यामुळे आपल्यासोबत धोका झाल्याचे हरिसिंहला समजले आणि त्याने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी दलाल इंदू भाईला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इंदू भाई उर्फ अंदूजी हा चालक आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले, तेथून आरोपीला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाशी लग्न झालेल्या तरुणीचे बनावट आधार कार्ड (आधार कार्ड) होते. नाव आणि पत्ता पडताळता आला नाही. वधूच्या फेक आयडीमध्ये तिचे नाव राधा असे लिहिल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत पोलिसांना नवरीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. फोटोच्या आधारे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. २ जूनला हरिसिंहने पोलिसांच तक्रार केली होती. सात महिने मुख्य आरोपी फरार होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली.