एखाद्याच्या आयुष्यात लग्नाचा दिवस खूप महत्वाचा असतो. सुखी संसाराची अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. नवरा-नवरीची खरेदी, दागिण्यांची खरेदी, ढोला-ताशा, बँड बाजा, वरात आदींची तयारी झालेली असते. भारतीय परंपरेनुसार नवरदेव मुलीच्या गावी, घरी तिला आणण्यासाठी वाजतगाजत जातो. अशावेळी नवरीमुलगी घरातून पळून गेल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. पण पंजाबचा हा किस्सा जरा वेगळाच आहे. नवरीसह तिच्या घरवालेच पळून गेल्याची घटना घडली आहे.
पंजाबच्या मोगा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. जेव्हा नवरदेव वरातीसह नववधूच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या घराला टाळे लागल्याचे दिसून आले. तिचा व तिच्या घरातल्यांचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे फोन बंद येऊ लागले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतापलेल्या नवरदेवाने पोलिसांत तक्रार केली आहे.
नवरदेवाचे नाव हरजिंदर सिंग आहे. त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, जवळपास एक महिना आधी हरजिंदरचे लग्न मोगा गावच्या रेडवा येथे राहणाऱ्या मुलीशी ठरले. लग्नाच्या एक दिवस आधी मुलीच्या कुटुंबाकडून शगुनही देण्यात आला होता. सोमवारी सकाळी जेव्हा वरात घेऊन निघाले तेव्हा त्यांची वरात काही लोकांनी रोखली. कार आडवी घालून त्यांनी नवरदेवाला तिच्या होणाऱ्या पत्नीचे आधीच कोर्ट मॅरेज झाल्याचे सांगितले.
हरजिंदरच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती अल्पवयीन होती. यामुळे त्याच्या त्या नवऱ्याला शिक्षाही झाली होती. जेव्हा आम्ही पुढे तिच्या घरी वरात घेऊन पोहोचलो तेव्हा दरवाजाला टाळे दिसले. यामुळे आम्ही मुलीच्या वडिलांना फोन लावला, तो स्विच ऑफ आला. यामुळे नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या मंडळींविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली.
यानंतर नवरदेवाने ११२ नंबरवर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी लगेचच नववधूचे घर गाठले आणि नवरदेवाला समजावले. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्यात सांगितले. यावर नवरदेवाने फसवणुकीचा तक्रार दाखल केली आहे.