Rajasthan Crime News : अनेकदा आपण ऐकतो की, नवरदेवाच्या परिवाराने नवरीकडील लोकांकडे पैशांची मागणी केली. सोबतच मुलांकडच्या लोकांची पैशांची डिमांड पूर्ण झाली नाही तर त्यांनी लग्नासही नकार दिल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण राजस्थानच्या जयपूरमधून याउलट एक घटना समोर आली आहे. इथे मुलीच्या परिवाराने लग्नाआधी नवरदेवाच्या परिवाराकडे दोन लाख रूपयांची मागणी केली. डिमांड पूर्ण झाली नाही म्हणून मुलगी आणि तिच्या परिवाराने लग्नास नकार दिला. यानंतर नवरदेवाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांच्यावर उपचार करून ते आता ठीक आहेत.
या घटनेनंतर नवरदेवाच्या वडिलांनी तरूणी आणि तिच्या वडिलांविरोधात फसवणुकीची तक्रार पोलिसात दाखल केली. एएसआय आशुतोष सिंह यांनी मीडियाला सांगितलं की, पीडित इंद्रराजने तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, त्यांच्या मुलाचं लग्न किरण नावाच्या तरूणीसोबत ठरलं होतं. २० फेब्रुवारीला लग्नाची तारीख ठरली होती. त्याआधी १९ तारखेला किरणच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी २ लाख रूपयांची मागणी केली.
इंद्रराजने सांगितलं की, जेव्हा मी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. सोबत त्यांनी सांगितलं की किरण आणि तिचे वडील शंकरने आधीच दागिने आणि कपडे घेण्यासाठी ४ लाख रूपये आमच्याकडून घेतले होते. इंद्रजीतने आऱोप लावला की, लग्न पत्रिका छापल्या होत्या, दागिने तयार झाले होते. सर्व गोष्टींची बुकिंग झाली होती. लग्नाच्या ऐनवेळी किरण आणि तिच्या वडिलांची नियत खराब झाली.
पीडित इंद्रराजने पोलिसांना सांगितलं की, लग्नाच्या पूर्ण तयारीनंतर शंकरचा फोन आला होता. शंकर म्हणाला होता की, लग्नासाठी काही पैसे कमी पडत आहेत. त्यासाठी केसीसी लोन घेत आहे. त्यासाठी तुम्हाला गॅरेंटर व्हावं लागेल. लग्नाची तयारी पाहून इंद्रराजने विश्वासाने काही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही केली. यानंतर शंकरने २ लाख रूपयांची मागणी केली. जेव्हा इंद्रराजने पैसे देण्यास नकार दिला तर शंकर आणि किरणने लग्नास नकार दिला. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.