छत्तीसगढच्या (Chhattisgarh) बस्तरमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर नवरीची पाठवणी करण्यात आली. रस्त्यात नवरीने टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत गाडी थांबवली. गाडीतून उतरून ती वॉशरूमला गेली, पण बराच वेळ परत आलीच (Bride Ran Away with Boyfriend) नाही. मग नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी तिचा शोध घेणं सुरू केलं. पण ती कुठेच दिसली नाही. त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घेराबंदी करून वाहनांची तपासणी केली. तेव्हा मानपूरमध्ये नवरी तिच्या प्रियकरासोबत पकडली गेली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दोघांनी हैराण करणारा खुलासा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा येथे राहणाऱ्या आरती सहारेचं लग्न गेल्या ६ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सावरगाव येथील तरूणासोबत झालं होतं. लग्नाचे रिवाज तरूणीच्या मूळ गावी म्हणजे बालोद जिल्ह्यातील दल्लीराजहरामध्ये पूर्ण केले गेले. लग्न झाल्यावर तिची रितसर पाठवणी करण्यात आली. गाडी राजनांदगांवच्या मानपूरजवळ पोहोचल आणि नवरीने टॉयलेटला जायचं असल्याचं सांगितलं. ती गाडीतून उतरली. पण परत आलीच नाही. ती अंधारात गायब झाल्याने नवरदेवाच्या परिवाराला धक्का बसला. नंतर पोलिसांनी वाहनांची चेकिंग करून नवरी आणि तिच्या प्रियकराला पकडलं.
व्हॉट्सअॅपवर पाठवलं होतं लाईव्ह लोकेशन
चौकशीतून समोर आलं की, आरती बस्तरमधील विकास गुप्ता नावाच्या तरूणावर बऱ्याच वर्षापासून प्रेम करत होती. पण कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. लग्नाआधी तरूणीवर अनेक बंधने घालण्यात आली होती. ज्यामुळे ती पळून जाऊ शकली नाही. त्यामुळे तिने लग्न करून सासरी जाताना पळून जाण्याचा प्लान केला. पाठवणीनंतर ती सतत प्रियकर विकासला लाइव्ह लोकेशन पाठवत होती. मग संधी मिळताच टॉयलेटला जाण्याचा बहाणा केला आणि फरार झाली.
आरतीने पोलिसांना सांगितलं की, तिने तरूणाला पळवलं आहे. तरूणाने तिला नाही. आरती म्हणाली की, तिने लग्नात सात फेरे घेतले नाहीत. मंगळसूत्रही तिने काढलं. तिचं लग्न जबरदस्ती लावून देण्यात आलंय. इतके नवरी गायब झाल्याची सूचना मिळताच पोलिसांनी याची माहिती आजूबाजूच्या जिल्ह्यांना दिली. मंगळवारी दुपारी १ वाजता कांकेर पोलिसांनी आरती आणि विकासला पकडलं. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.