राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये पती-पत्नींमधील नाजूक संबंध, मारहाणीवर सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये काही कारणांमुळे पतीकडून पत्नीला होणारी मारहाण ही मान्य आहे. यामध्ये न सांगता बाहेर गेलात तर, घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष करणे, पतीसोबत वाद, सेक्स करण्यास नकार, अन्न नीट न शिजवणे, लफडे असल्याचा संशय, सासरचा अनादर ही कारणे आहेत. असे असताना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे.
झींझक गावात एका तरुणाचे लग्न झाले, लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचा डोळा लागला व ती झोपी गेली. खोलीमध्ये आलेल्या नवरदेवाने ते पाहिले आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तिला उठवून त्याने लाथा बुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. या प्रकारामुळे हादरलेल्या नववधूने सकाळी तिच्या वडिलांना नवऱ्याच्या या कृत्याची कल्पना दिली.
सोमवारीच या दोघांचे लग्न झाले होते. रात्री आठ वाजता नववधूची पाठवणी करण्यात आली. यानंतर ती घरी पोहोचली होती. दिवसभर थकल्याने तिला डुलकी लागली. यामुळे नाराज झालेल्या नवऱ्याने तिला जबर मारहाण केली. सकाळी तिच्या वडिलांनी मंगलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत नवऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. तसेच तिचे वडील नववधूला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस अधिकारी एस के मिश्र यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्याने तरुणाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतू अद्याप कोणीही माघार घेतलेली नाही.