नवी दिल्ली - बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नववधू नटून-थटून नवरदेवाची वाट पाहत होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे मंडळी आली होती. गाणी लावून लहान मुलं नाचत होती. उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचा मंडप सजला होता. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला. एका मेसेजने आनंदावर विरजण पडलं. हुंड्यात 2 लाख रुपये कमी आहेत. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असा मेसेज हा नवरदेवाकडून करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या धक्कादायक घटनेत वराच्या बाजूच्या लोकांनी दोन लाख रुपये हुंडा कमी दिल्याचं कारण देत लग्न मोडल्याची चर्चा आहे. लग्न मोडल्यानंतर सोमवारी मुलीच्या वतीने महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन न्याय मागितला आहे. हुंडाबळी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस वराच्या पक्षाला पोलीस ठाण्यात बोलावतील, जेणेकरून दुसरी बाजू जाणून घेऊन प्रकरणाचा तपास करता येईल.
"दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नाही"
मुलीने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशीच वराच्या घरच्यांनी निरोप पाठवून दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नसल्याचं सांगितलं. वधू पक्षाच्या लोकांनी सांगितलं की, वराला हुंड्यात 3.50 लाख रोकड, एक अंगठी आणि 10 हजार रुपयांचे कपडे यासह लग्नातल्या खर्चासाठी 1.65 लाख रुपये दिले होते. लग्नाची सर्व तयारी तिच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली होती. मात्र तरी देखील 13 डिसेंबरला लग्नाच्या दिवशी वर मंडळी वरात घेऊन आले नाहीत असं मुलीने म्हटलं आहे.
मुलाच्या बाजुने बाहेरील लोकांमार्फत मेसेज केला. यामध्ये दोन लाखांपेक्षा कमी हुंड्यामुळे लग्न न झाल्याची चर्चा होती. लग्नाआधी बुकिंग आणि सर्व प्रकारचा कार्यक्रम मुलाच्या संमतीने केल्याचंही नवरीने सांगितलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाजसुधारणा अभियानांतर्गत अंमली पदार्थ निर्मूलन, बालविवाह बंदी आणि हुंडा निर्मूलन या तीन प्रमुख मुद्द्यांचा संदेश जनतेमध्ये असताना बिहारमध्ये ही परिस्थिती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.