पंजाबमधील जालंधरमधील रामा मंडी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या साखरपुड्याच्या समारंभामध्ये डायमंडच्या अंगठीवरुन झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. डायमंडच्या अंगठीच्या मागणीवरुन हॉलवरच वर आणि वधू पक्षातील लोकांचा वाद सुरु झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की वधुवर पक्षाच्या माणसं एकमेकांना मारहाण करु लागले. डायमंड अंगठी न दिल्याने साखरपुडा रद्द करण्यात आला. दुसरीकडे या हाणामारीमध्ये मुलाकडील लोकांनी नवरीचे केस ओढून तिला मारहाण केल्याचा आरोप वधू पक्षाने केला आहे. वर पक्षातील लोकांना मुलीकडच्यांकडून डायमंड अंगठी न मिळाल्याच्या रागातून वधू पक्षातील लोकांना मारहाण केली. हॉटेलमध्ये वाद घातला आणि घटनास्थळावरुन पळ काढला.
या हाणामारीच्या घटनेनंतर मुलीकडील मंडळीने पोलिसांमध्ये रितरस तक्रार नोंदवली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता पोलीस याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीकडील मंडळीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये साखरपुडा ठरवण्याआधी मुलाकडच्यांनी डायमंड अंगठीची मागणी केली नव्हती. मात्र रविवारी या साखपुड्याच्या समारंभादरम्यान जेव्हा वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालण्याची वेळ आली. त्यावेळी वरपक्षाने डायमंड अंगठी, सोन्याचं कडं आणि कानातील वळ्याची मागणी मुलीच्या घरच्यांकडे केली. त्यानंतर त्यांनी वर पक्षाची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वादाचे हाणामारीत रूपांतर झालं. नंतर प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी दोघांचं लग्न जमवणाऱ्याला बोलवण्यात आलं. तेव्हा मुलाचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलं असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्याने आपल्या आधीच्या पत्नीला सोडून दिलं असून आता तो दुसरं लग्न करु इच्छित असल्याचं समोर आलं. यावरुन मुलीकडील मंडळी चांगलेच संतापले. उलटपक्षी मुलाकडील मंडळींनी मुलीच्या नातेवाईकांना आणि मुलीला मारहाण करुन तिथून पळ काढला.