पाकिस्तानच्या(Pakistan) लाहोर(Lahore Crime News) मध्ये एक ब्रिटीश विद्यार्थीनी माहिरा जुल्फिकार(२६)ची गोळी झाडून हत्या (British Student Murder in Lahore) करण्यात आली आहे. स्थानिक मीडियानुसार पाकिस्तानातील दोन गुंड तिच्या प्रेमात पडले होते आणि त्यांना तिच्यासोबत जबरदस्ती लग्न करायचं होतं. मात्र, तिने दोघांनाही नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. ती लाहोरच्या एका अपार्टमेंटमध्ये मृत आढळून आली. माहिरा मैत्रीणीच्या लग्नासाठी पाकिस्तानात आली होती. मात्र, ब्रिटनमध्ये क्वारंटाईनची मोठी रक्कम चुकवावी लागू नये म्हणून ती काही दिवसांसाठी इथेच थांबली होती.
ब्रिटनमध्ये कायद्याचं शिक्षण घेणारी महिरा दक्षिण-पश्चिम लंडनमध्ये राहते. ती सोमवारी लाहोरच्या डिफेंस एरियामध्ये मृत आढळून आली होती. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी सकाळी ४ हल्लेखोर कथितपणे माहिराच्या बेडरूममध्ये शिरले आणि तिची गोळ्या झाडून हत्या केली.
ब्रिटनने पाकिस्तानला कोरोना व्हायरसच्या रेड लिस्टमध्ये टाकल्यानंतर माहिराने लाहोरमध्ये आपल्या आजीकडे काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला होता. तिला वाटलं की, पाकिस्तानला रेड लिस्टमधून काढलं जाईल आणि लंडनमध्ये तिचे क्वारंटाईनसाठी लागणारे पैसे वाचतील.
इंडिपेडंट उर्दूनुसार, माहिराचे काका मोहम्मद नजीर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी जाहिर जदून आणि साद अमीर बट्ट या तरूणांवर माहिराच्या हत्येचा आरोप लावला आहे. नजीर यांनी दावा केला आहे की, हे दोन्ही तरूण काही दिवसांपासून माहिराला त्रास देत होते आणि तिला धमक्या देत होते.
नजीर यांनी दावा केला की, माहिराला या दोन तरूणांनी काही लोकांना सोबत घेऊन मारलं. बट्ट आणि जाहिरला माहिरासोबत लग्न करायचं होतं. पण दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. तेच माहिराला दोन्ही तरूणांमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. ती इथे केवळ तिच्या मैत्रीणीच्या लग्नासाठी आली होती.
अशीही माहिती समोर येत आहे की, दोघे त्रास देत असल्याची अनेकदा तक्रार करूनही पोलिसांनीही काही कारवाई केली नाही. असाही आरोप केला जात आहे की, लाहोर पोलीस साद आणि जाहिरला मदत करत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना पडकण्याऐवजी माहिरासोबत राहणाऱ्या तरूणीलाच ताब्यात घेतलं. माहिराला या घटनेत दोन गोळ्या लागल्या.