भिवंडी : शहरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सोन साखळी चोरांसह चोरलेले सोने विक्री करणाऱ्या दलालासह तिघांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपयांचे २८ तोळे सोने व एक दुचाकी असा नऊ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चोरट्यांनी शहरात केलेल्या नऊ गुन्ह्याची देखील उकल करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी दोन सोनसाखळी चोरट्यांना पकडणाऱ्या पोलिसांचा सन्मान देखील करण्यात आला.सोनु गोविंद पाल वय २८ रा उल्हासनगर ,कमलाकर गपणत डोंगरे वय ३६ रा. बोरपाडा व सहकारी स्वप्नील गजानन हरड,वय ३० रा.टिटवाळा, कल्याण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवंडी शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे,पोलिस निरीक्षक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश हरणे व लहू गावित हे गस्त घालीत असताना पद्मानगर भागात दोघे संशयित दुचाकी वरून जाताना आढळून आल्याने दोघांनी त्यांच्या दुचाकीस ठोकर मारून पकडण्या साठी पाडले असता एक चोर ताब्यात आला तर एक जण जवळच असलेल्या इमारतीच्या टेरेस वरून पोलिसांच्या डोळ्यात मिर्ची पावडर स्प्रे मारून पळून जात असताना पोलिसांनी त्यास इमारतीच्या डक मधून उतरत असताना पकडले.त्यांची कसून चौकशी केली असता शहर पोलिस ठाणे हद्दीतील आठ व मानपाडा पोलिस ठाणे हद्दीतील एक अशा नऊ गुन्ह्यांची उकल केली.त्यांनी चोरी केलेल्या सोन्याचा तपास घेतला असता त्यांनी चोरलेले सोने आपला साथीदार स्वप्नील गजानन हरड यांच्या मार्फत नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे श्री साईसंत ज्वेलर्स याला विकल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी ८ लाख ६१ हजार रुपये किमतीचे २८ तोळे सोने व ५० हजार किमतीची दुचाकी जप्त केली आहे.
कुरिअर बॉय व सेल्समन निघाले चोरटे-
पोलिसांनी पकडलेले दोघे सोनसाखळी चोरटे हे सराईत गुन्हेगार असून सोनु गोविंद पाल हा सेल्समनचा व्यवसाय करणारा असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात १९ गुन्हे दाखल असून कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या कमलाकर गपणत डोंगरे यावर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. पोलिस शिपाई गणेश हरणे व लहू गावित यांचा या यशस्वी कामगिरी बद्दल पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सन्मान केला असून पोलिस आयुक्त यांनी बक्षीस जाहीर केले आहे.