लातूर - वडिलांची संपूर्ण मालमत्ता आपल्यालाच मिळावी, या हव्यासापोटी मित्राच्या मदतीने अविवाहित असलेल्या दगडू उर्फ विशाल हरिभाऊ गायकवाड (१९) या लहान भावाचा खून मोठ्या भावाने केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सहा दिवसांपूर्वी अपहरण करून खून करून प्रेत नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. मुरुड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोघांना अटक केली आहे.
लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील हरिभाऊ उद्धवराव गायकवाड (५५) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझा मोठा मुलगा विपीन हरिभाऊ गायकवाड (२६) याने संपूर्ण मालमत्ता त्याला एकट्यालाच मिळावी या हव्यासापोटी त्याचा मित्र विकास व्यंकट ढाणे (२३, रा. रांजणी, ता. कळंब) याच्या मदतीने लहान मुलगा दगडू उर्फ विशाल हरिभाऊ गायकवाड (१९) याचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने आपणच मित्राच्या मदतीने दगडूचा खून करून त्याचे प्रेत अंबाजोगाई तालुक्यातील तटबोरगाव शिवारात मांजरा नदीपात्रात टाकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी तब्बल दोन दिवस नदीपात्रात शोध घेऊन प्रेत बाहेर काढले. बुधवारी तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून युवकाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी आरोपींवर कलम ३०२, २०१, ३६४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केल्याचे सपोनि. धनंजय ढोणे यांनी सांगितले.
भावानेच दिली अपहरणाची तक्रार...आरोपी विपीन गायकवाड यानेच आपला लहान भाऊ शेतात जातो म्हणून निघून गेल्याबाबतची तक्रार तक्रार ८ ऑक्टोबर रोजी मुरुड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास केला असता मोबाईल कॉलरेकॉर्ड काढले. त्यावरून संशय आल्याने पोलिसांनी फिर्यादी असलेल्या भावास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच मित्राच्या मदतीने आपणच भावाचा खून केल्याची कबुली दिली.
चार किलोमीटर घेतला शोध...नदीपात्रात टाकून दिलेले प्रेत पोलिसांनी दोन दिवस जवळपास चार किलोमीटर नदीपात्र शोधून काढले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात मुरुडचे सपोनि. धनंजय ढोणे, पोउपनि. सुर्वे, आट्टरगे, विष्णू चौगुले, पोहेकॉ. राजाभाऊ खोत, विठ्ठल साठे, बहादूर सय्यद, बाबासाहेब खोपे, महेश पवार, चालक नागनाथ जांभळे यांनी परिश्रम घेत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने नदीपात्रातून प्रेत बाहेर काढले.