अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून सावत्र भावाने गळ्यावर सुरीने सपासप वार केल्याची घटना २५ एप्रिलराेजी घडली. दरम्यान, या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावाचा मृत्यू झाला. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात मंगहवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, तळेगाव येथे सोमवार, २५ एप्रिलराेजी सायंकाळी सातच्या सुमारास नळाला पाणी आले होते. दरम्यान, पाणी भरताना गणेश बाबुराव ससाणे (वय १९) आणि त्याच्या सावत्र भावाची पत्नी जयश्री ससाणे (वय २७) यांच्यामध्ये वाद झाला. जयश्रीचे पती चालक म्हणून काम करतात. तासाभराने नितीन बाबुराव ससाणे (वय ३५) हे कामावरुन घरी परतले असता, पत्नीने नळावर पाणी भरताना घडलेला प्रकार पतीला सांगितला.
रागाच्या भरात नितीन ससाणे हे घराबाहेर जाऊन येतो असे सांगितले. ते घराबाहेर पडले मात्र रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मानेवर जखम झालेल्या आवस्थेत ते घरी परतले. त्यांनी सांगितले, गणेश याने सुरीने माझ्या गळ्यावर वार केले आहेत. जखमी नितीन ससाणे याला त्यांच्या पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याच मृत घाेषित केले.
याबाबत पत्नी जयश्री ससाणे यांच्या तक्रारीवरुन सावत्र दीर गणेश ससाणे, सासरे बाबुराव ससाणे (वय ६०) यांच्याविराेधात अहमदपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ भादंवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गणेश ससाणे हा पळून गेला आहे. तर मयताच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे करीत आहेत.