लातूर / चाकूर : काैटुंबीक वादातून सासरा व्यंकट भीमराव नंदगावे यांचा चाकुरातील बाेथी चाैकात काेयत्याने वार करुन खून केल्याप्रकरणी जावइ पुंडलिक गाेविंद काळे याला लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय.पी. मनाठकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील व्यंकट भीमराव नंदगावे (वय ४६) यांच्या मुलीचा देवणी तालुक्यातील पंढरपूर येथील पुंडलीक गाेविंद काळे (वय २६) याच्याशी झाला हाेता. दरम्यान, जावई पुंडलीक काळे हा मुलगी जनाबाई हिला सतत छळत हाेता. त्यातूनच जावइ आणि सासऱ्यामध्ये सतत वाद हाेत हाेते. तर व्यंकट नंदगावे हे दुसऱ्या मुलीच्या विवाह स्थळासाठी भातांगळी येथे गेले हाेते. गावाकडे परत जाण्यासाठी १५ जुलै २०१८ राेजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चाकूर येथील बाेथी चाैकात ते थांबले हाेते. यावेळी लातूर येथून नवीन काेयता खरेदी करुन सासऱ्यावर पाळत ठेवत, मागावर असलेल्या जावयाने सासरा व्यंकट नंदगावे यांच्यावर सपासप वार करुन खून केला. हल्ल्यानंतर रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरुन फरार झालेला जावइ पुंडलिक गाेविंद काळे याच्या पाेलिसांनी तातडीने मुसक्या आवळल्या. घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक रामेश्वर तट, एस.बी. आरदवाड यांनी करुन लातूर येथील न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले.
सदरचा खटला लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश वाय.पी. मनाठकर यांच्या समाेर चालला. प्रत्यक्षदर्क्षी साक्षीदाराची साक्ष गृहीत धरुन आराेपी पुंडलिक काळे याला कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकाच्या पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदारांच्या साक्ष झाल्या असून, त्या महत्वपूर्ण ठरल्या. या खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील संताेष देशपांडे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून पाेलीस हवालदार आर.टी. राठाेड यांनी सहकार्य केले.