गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद येथील ऑनर किलिंग प्रकरणात न्यायालयाने मुलीच्या आरोपी भावाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे हत्याकांड घडले त्यावेळी मुलगी गरोदर होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने १७ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ६७ कागदपत्रांच्या आधारे मुलीच्या भावाला फाशीची शिक्षा सुनावली.
2018 मध्ये तरुण आणि तरुणीने पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पकडले जाण्याच्या भीतीने दोघेही पळत होते. दरम्यान, दोघेही साणंद येथे राहायला आले होते. मुलीच्या भावाला याची माहिती मिळताच तो संतापाच्या भरात तेथे पोहोचला आणि धारदार शस्त्राने त्याने बहिणीवर ७ सपासप वार केले आणि त्याने आपल्या भाओजीवर १७ हून अधिक वार केले, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हत्येवेळी मुलगी गरोदर होती, त्यामुळे पोलिसांनी तिघांच्या मृत्यूची नोंद केली होती. ऑनर किलिंगच्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली. त्याचवेळी हा निर्घृण खून केल्यानंतर आरोपी हार्दिक चावडा याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप झाला नाही.जबाब आणि पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अहमदाबादच्या ग्रामीण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यानंतर न्यायालयाने आरोपींना तीन जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.