सुपे : बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी अंतर्गत असणाऱ्या राजबाग येथे सख्या भावानेच भावावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिल्याची घटना बुधवारी ( दि.१२ ) रात्री साडेआकराच्या सुमारास घडली.घरातुन वेगळे राहण्याच्या वादातुन हा प्रकार घडला असुन यामध्ये मारुती वसंत भोंडवे ७० टक्के भाजल्याने ससुनमध्ये उपचार घेत असताना शुक्रवारी ( दि.१४ ) दुपारी मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी अनिल वसंत भोंडवे ( वय ३२ रा. राजबाग ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो फरारी असल्याची माहिती पोलिस हवालदार भाऊसाहेब शेंडगे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळखैरेवाडी अंतर्गत असणाऱ्या राजबाग येथे बुधवारी ( दि. १२ ) रात्री राहत्या घरी मारुती, त्याची पत्नी सविता आणि मुलगा महेश व हर्षद हे सर्वजण झोपले होते. यावेळी घरातुन वेगळे राहण्याच्या वादातून धाकट्या भावाने ( अनिल ) घराची कडी बाहेरुन लावुन खिडकीच्या काचा फोडुन थोरल्या भावाच्या ( मारुती ) अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन देण्याचा प्रकार घडला. यावेळी मारुती याची पत्नी आग विझवण्याकरीता पुढे आली मात्र त्याही यामध्ये भाजल्या गेल्या. यावेळी तिने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलवण्यात आले.
त्यामुळे मारुती यास उपचारासाठी ससुन येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी पुणे येथील ससुन रुग्णालयात गुरूवारी ( दि. १३ ) पोलिसांनी मारुती यांचा जबाब नोंदवला. मात्र ७० टक्के भाजल्याने मारुती याचा उपचारादरम्यान शुक्रवारी ( दि. १४ ) दुपारी मृत्यु झाला. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत. दरम्यान बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. ...........................................