मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा:- ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे. पेल्हार येथे दोघे ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आप्पा मैदान, नवजिवन शांतीनगर येथे येणार असल्याबाबतची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना यांना मिळाली होती. त्यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळविल्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सदर आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि सोपान पाटील व अंमलदार असे पोलीस पथक तयार करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
सदर बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, गुन्हेप्रकटीकरण कक्षाचे सपोनि सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखील मंडलिक, दिलदार शेख, सुजय पाटील यांनी आप्पा मैदान, नवजीवन येथे सापळा रचुन आरोपी अलीम इलाही सय्यद (२३) आणि उमेश राजाभाऊ सुर्यवंशी (२१) यांना ताब्यात घेतले. दोन पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यात २५.६०० ग्रॅम वजनाचा २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा ब्राऊन शुगर अंमली पदार्थ मिळुन आला.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील यांनी केली आहे.