पिंपरी : प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर त्याचे ‘रिल्स’ केले. त्यामुळे तळेगाव दाभाडे येथे दोन टोळ्यांमध्ये सोशल मीडियावर ‘स्टेटस वॉर’ छेडले. यातून एका तरुणाचा निर्घृणपणे खून केला.
प्रणव उर्फ जय अनिल मांडेकर (वय १९) याचा रविवारी (दि. ६) रात्री खून झाला. त्याप्रकरणी रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे, मंगेश दशरथ हिरे, रोहन उर्फ ढुंगण बाळ्या बापू सुरते, सागर रमेश गाडे, कुणाल उर्फ बाबा धीरज ठाकूर, प्रशांत बापू पाटील यांना अटक केली. त्यांच्या पाच अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बाबा ठाकूर याची बाबा टोळी आहे. तर मयत प्रणव याचा मित्र विशाल वर्मा याची सरकार ग्रुप ही टोळी आहे. दोन्ही टोळ्यांतील सदस्य विरोधक टोळीला चिथावणी देणारे स्टेटस ठेवत होते. तसेच प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्याला मारहाण केल्याचे रिल्स तयार केले. यातून दोन्ही टोळ्यांमध्ये स्टेटस वाॅर छेडले. रविवारी रात्री प्रणव त्याच्या मित्रांसोबत तळेगाव दाभाडे येथील एका मैदानात बसला असताना त्याचा मित्र विशाल वर्मा आणि आरोपी मंगेश हिरे यांच्यात फोनवर बाचाबाची झाली. त्यानंतर दुचाकींवरून सशस्त्र आलेल्या आरोपींना घाबरून मैदानावरून प्रणव मांडेकर आणि त्याचे मित्र पळून जाऊ लागले. त्यावेळी आरोपींनी कोयता, रॉड आणि पालघनने वार करून प्रणवचा खून केला.
कुणाल उर्फ बाबा ठाकूर हा तीन गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार होता. या कालावधीत त्याने तळेगाव दाभाडे शहरातून खोपोली येथे बस्तान हलवले होते. खोपोली येथे तो पत्नी आणि आईसोबत राहत होता. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी आणि शस्त्र विरोधी पथकाने तांत्रिक माहिती काढून त्याला खोपोली मधून तर त्याचा साथीदार प्रशांत पाटील याला मळवली येथून अटक केली. शस्त्र विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, कर्मचारी शाम शिंदे, चंद्रकांत गवारी, प्रितम वाघ, गुंडा विरोधी पथकाचे कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, शाम बाबा, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.