बंगळुरू - कर्नाटकमधील बेल्लारी येथे मंगळवारी संध्याकाळी भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. पोल्ट्रीचा व्यवसाय करणारे नेट्टारू संध्याकाळी घरी येत होते. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. प्रवीण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना वाचवता आले नाही.
नेट्टारू यांची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या हत्याकांडाबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या आरोपानुसार हल्लेखोर केरळमधील रजिस्टर्ड नंबर असलेल्या बाईकवरून आले होते. जिथे हा हल्ला झाला. ते ठिकाण केरळच्या सीमेपासून जवळच आहे.
या प्रकरणात कर्नाटक पोलिसांना गुन्हा नोंद केला आहे. तसेच तपास सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून तीन जण आले होते. या घटनेनंतर नेट्टारू यांच्या हत्येविरोधात रात्री भाजपा आणि युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तसेच त्यांच्याकडून आम्हाला न्याय हवा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हत्या झालेल्या भाजपा नेत्याच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. तसेच लवकरच न्याय मिळेल, असं आश्वासन दिलं आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आमच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. तसेच कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. प्रवीण यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे ट्वीट बोम्मई यांनी केले आहे.