बिहारच्या सिवान जिल्ह्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. केवळ ८० रुपयांसाठी एका BSF जवानाने दुकानदारावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वीच स्थानिकांनी जखमी दुकानदारास रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर, जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी जवानास अटक केली आहे.
उज्ज्वल पांडे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून पिस्तुल, दोन मॅगझीन, 4 जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. महाराजगंजच्या पोखरी गावात ही घटना घडली. येथील दुकानदार मुन्नीलाल ताडी विकण्याचं काम करतो, त्याकडे जवान उज्ज्वल पांडे आला असता दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. ताडी पिल्यानंतर मुन्नीलालने उज्ज्वल पांडेकडे पैशांची मागणी केली. पैसे मागितल्याचा राग सहन न झाल्याने पांडेने दुकानदारावर तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये, मुन्नीलाल गंभीर जखमी झाला असून स्थानिकांनी तात्काळ सिवानमधील रुग्णालयात त्यास दाखल केले. त्यानंतर, पोलिसांनी सूचनाही देण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी महाराजगंजचे एसडीओपी पोलस्त कुमार यांनी सांगितले की, आरोपी उज्ज्वल पांडे यांस अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी त्यास अटक केली, तेव्हा तो नशेत होता. तो रतनपूरचा रहिवाशी असून त्याच्याकडून दोन मॅगझीन, १ पिस्तुल, ४ जिवंत काडतूस आणि एक बाईक जप्त करण्यात आली आहे. गोळीबारातील जखमी मुन्नीलालचा जीव सुदैवाने वाचला असून त्याच्या जीवाला कुठलाही धोका नसल्याचंही कुमार यांनी सांगितलं.