सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसायामध्ये तोटा झाल्याने तो सावरण्यासाठी तीन टक्के व्याजदराने १० लाख ५० हजार घेतले. सावकारानं तीन नव्हे ३० टक्के व्याजानं ७० मागणी केली. साईटवरुन उचलून खोलीमध्ये डांबून ठेवून मारहाण केल्याची तक्रार अजिंक्य मनोज जोशी या बिल्डरने जेलरोड पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार सावकार श्रीनिवास संगा याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबरपासून आजतागायत सुरु असल्याच म्हटले आहे.
फिर्यादीत बिल्डर अजिंक्य जोशी यांनी म्हटले आहे की, विजया डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन नावाने त्यांचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसायात तोटा झाल्याने तो भरुन काढावा म्हणून १ सप्टेंबर २०२१ मध्ये जोशी यांनी श्रीनिवास संगा (रा. गोली अपार्टमेंट, ७० फूट रोड, सोलापूर) याच्याकडून तीन टक्के व्याजदराने १० लाख ५० हजार रुपये घेतले.
सुरुवातीच्या महिन्यापासून व्याजाचे ३ टक्के दराने ३० हजार रुपये देण्यासाठी फिर्याद गेले असताना त्यांना ‘मी तुला ३ नाही ३० टक्के व्याजाने पैसे दिले आहेत तेव्हा ३० हजार नाही तर ३ लाख रुपये दे नाहीतर मी तुला येथून सोडणार नाही’ असा दम भरला. म्हणून फिर्यादीकडून आजतागायत ऑनलाईन ४७ लाख आणि उर्वरित रक्कम त्याच्या साथीदाराकरवी ६० लाख रुपये देऊनही सावकार संगा याने ७० हजार रुपयांची मागणी केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात सदर संशयित आरोपीविरुद्ध भा. द. वि. ३४२,३२३, ५०४, ५०६ सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४४, ४५ अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सपोनि सोनवणे करीत आहेत.
दहा तास खोलीत डांबून मारहाणगेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी संगा याच्या साथीदारांना फिर्यादीच्या कार्यालयात पाठवले. फिर्यादी बाळे येथील साईटवर असताना तेथे जाऊन त्याला गोली अपार्टमेंट येथे घेऊन गेले. तेथे आठ ते दहा तास डांबून ठेवून मारहाण केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.