पुणे : भागीदारीत एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाने पैसे घेऊन ते प्रकल्पात न गुंतविता फसवणुक केल्या प्रकरणी कोंढवापोलिसांनी बांधकाम व्यावसायिक व भाजपनेते रत्नाकर पवार (रा. नाशिक) यांना अटक केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नाकर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर तब्बल ६ महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे. लॉकडाऊननंतर सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरु झाल्यानंतर २ जून रोजी तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाने रत्नाकर पवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोंढवा पोलीस त्यांचा शोध घेत होते़. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, रत्नाकर पवार आणि अशोक अहिरे यांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी मोहद्दीस महंमद फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. बखला यांची स्वत:ची टुर्स अँड ट्रव्हल्सची व ड्रीम होम कन्स्ट्रक्शन कंपनी आहे़ दस्तागीर पटेल हे भागीदार असून त्यांना फेबु्रवारी २०१७ अनिस मेमन यांनी इतर आरोपींशी ओळख करुन दिली. नाशिक येथील रत्नाकर पवार यांच्या मालकीच्या गिरणा इंफ्रा प्रोजेक्ट व इतर ठिकाणी पैसे गुंतविल्यास भरपूर फायदा मिळेल असे सांगितले. त्यांच्याबरोबर करार करुन त्यांची आरोपींनी आकर्षक मोबदल्याचा बहाणा करुन १ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आह..या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी याअगोदर काही जणांना अटक केली आहे.रत्नाकर पवार हे नाशिकमधील भाजपनेते आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत निवडणुक लढविली होती.
कोंढव्यातील फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, भाजपनेते रत्नाकर पवार यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:19 PM
कोंढव्यातील व्यावसायिकाची केली १ कोटी ६४ लाखांची फसवणूक
ठळक मुद्देतब्बल 6 महिन्यानंतर पोलिसांना अटक करण्यात यश