मुंबई - बनावट कागदपांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर(50 कोटी किंमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (74) गुजरातमधून आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली. लकडावाला विमानाद्वारे लंडनला जात असताना त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल केले होते. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनच ईओडब्ल्यूकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयातील जितेंद्र बडगुजर यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा लकडावालासह मोहन नायर नावाच्या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी लकडावालाला याला शुक्रवारी अहमदाबाद येथून अटक करण्यात आल्याचे उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. त्याला ट्रान्झिट रिमांडवर उद्या मुंबई आणण्यात येणार आहे. आरोपीने ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन बनावट केल्याचा आरोप आहे. तसेच न झालेला व्यवहार या कागदपत्रांच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार उघड होऊ नये यासाठी मुंबईतील नोंद करण्यात आलेले नोंदणी क्रमांक वापरले. तसेच मूळ कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज लकडावाला अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्याच्या प्रयत्न असताना त्याला ईओडब्ल्यूने अटक केली.
50 कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी बिल्डर लकडावालाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:25 PM