पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्या खुनामागील कारण स्पष्ट झाले आहे. बावधन येथील जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रकरणाचा निर्णय कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्यामुळेच त्यांचा खून करण्यात आला. बंडगार्डन पोलिसांनी राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश कुऱ्हे यांच्यासह आणखी एका मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी कानाबार यांचे वाहनचालक विश्वास दयानंद गंगावणे (वय ३२, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. राजेश हरीदास कानाबार ऊर्फ राजूभाई (वय ६४, रा. सोपानबाग, घोरपडी) यांचा सोमवारी दुपारी गोळ्या झाडून खुन करण्यात आला होता. कानाबार यांची बावधन येथे १० एकर जमीन आहे. या जमिनीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात केस सुरु होती. सोमवारी त्यांची तारीख होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. या केसचा निकाल कानाबार यांच्या बाजुने लागणार असल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले. त्यामुळे या जमिनीवर डोळा असणाऱ्यांनी इतरांशी संगनमताने कानाबार यांचा खून केल्याचे गंगावणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.कानाबार हे जिल्हाधिकारी कार्यालयातील काम संपल्यावर दुपारी पावणे तीन वाजता बाहेर आले. शासकीय कोषागाराजवळ लावलेल्या आपल्या गाडीकडे जात होते. तेथील फळविक्रेत्यांकडून त्यांनी फळे घेतली. त्यानंतर ते गाडीत बसण्यासाठी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. त्यांच्यापैकी एकाने पिस्तुलातून कानाबार यांच्यावर गोळी झाडली. अगदी जवळून गोळी झाडल्याने ती त्यांच्या छातीवर लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघेही हल्लेखोर कॅम्पच्या दिशेने पळून गेले. हा प्रकार त्यांच्या चालकांनी पाहिला. त्याने त्यांना गाडीत बसवून तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून सह पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. बंडगार्डन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
‘या’ कारणासाठी झाला बांधकाम व्यावसायिकाचा खून; बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 12:30 PM