लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न व खंडणी वसूल केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी बेकायदा अटक केल्याचा दावा बुकी अनिल जयसिंघानी याने केला आहे. त्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने अनिल जयसिंघानीची याचिका फेटाळली. अमृता फडणवीस यांनी मलबार पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने वडिलांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळावा, यासाठी अमृता फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी अनिक्षाने त्यांना एक कोटी रूपये लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अमृता यांनी प्रतिसाद न दिल्याने अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करून १० कोटी रूपये खंडणी म्हणून उकळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अनिल व त्याचा चुलत भाऊ निर्मलला २० मार्चला गुजरातहून अटक केली. दोघांनाही २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आपल्याला अटक केल्यानंतर २४ तासांत न्यायालयात हजर करण्यात आले नाही. त्यामुळे ही अटक बेकायदा आहे, असा दावा करत जयसिंघानीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान, शनिवारी सत्र न्यायालयाने अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळला, तर निर्मलचा जामीन मंजूर केला.