भगवान वानखेडे, बुलडाणा: शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या येळगाव येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून २ ऑगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये शाळेचे संस्थाचालक माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ मध्यप्रदेश राज्यातील निमखेडी (जि. खांडवा) रहिवासी रमेश लेहरसिंग दुबे (३०) यांनी २ ऑगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, त्यांनी त्यांचा मुलगा रोशन रमेश दुबे याचे येळगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत वर्ग पहिलीमध्ये प्रवेश करून ते पत्नीसह पुणे येथे कामासाठी निघून गेले होते. त्यानंतर १६ जुलै रोजी सकाळी ११.३० कामावर असताना शाळेच्या अधिक्षक इंगळे यांचा फोन आला की, रोशनच्या अंगावर शाळेचे गेट पडल्याने तो जखमी झाला आहे.
रोशन बद्दलची माहिती मिळाल्यानंतर मी बुलडाण्यात पोहोचलो असता रोशन याचा मृत्यू झाल्याचे कळले. तेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेला भेट दिली असता लोखंडी गेटला खालून लॉक नसून याबाबत अनेक वेळा संस्थाचालकांसह शिक्षक आणि अधीक्षकांना सांगितले होते. मात्र, याची कुठलीही दखल न घेतल्याने ते लोखंडी गेट तसेच नादुरुस्त होते. तेव्हा बेजबाबदारपणामुळे रोशनचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तक्रारदार दुबे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह पाच जणांविरुद्ध २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल- माजी आमदार तथा संस्थापक संस्था चालक विजयराज शिंदे, मुख्याध्यापक विजय काशीनाथ शिंदे, मुख्याध्यापक रामचंद्र सीताराम रिंढे, अधीक्षक अंकुश ब्रिजलाल जाधव, चौकीदार नीलेश अर्जुन चव्हाण या पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरे करीत आहेत.