बुलडाण्यात भावाने केला बहिणीचा गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 4:26 PM
कौटुंबिक वादातून भावाने बहिणीचा खून केल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी बुलडाण्यात उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कौटुंबिक वादातून भावाने बहिणीचा खून केल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी बुलडाण्यात उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.अंकिता शर्मा (२८) असे मृत महिलेचे नाव असून सागर शर्मा नामक तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमक्या कोणत्या कारणावरून सागरने बहिणीचा खून केला ही बाब अद्याप स्पष्ट होवू शकली नाही. पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून २८ जुलै रोजी मध्यरात्री हा खून झाला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी सागर शर्मा याने गळा आवळून आपल्याच बहिणीचा खून केला आहे. ही खुनाची घटना २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीचा परिसर गाठला. सोबतच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये गर्दी केली होती. आरोपी सागर शर्माने गळा आवळून आपल्या बहिणीचा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्ष उत्तरीय तपासणीनंतर ही बाब स्पष्ट होईल, असे तपासी अधिकारी अमित जाधव यांनी सांगितले. घटनेनंतर सकाळी आरोपी सागर शर्मा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे. नेमक्या कोणत्या कारणावरून त्याने आपल्या बहिणीचा खून केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस त्यादृष्टीने तपास करत असल्याचे ठाणेदार प्रदीप साळूंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.बुलडाणा शहरातील गजबजलेल्या विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये सकाळीच ही घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव हे ठाणेदार प्रदीप साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. दरम्यान, मृतदेहाचे अद्याप शवविच्छेदन करण्यात आले असून त्यात काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचीही तपासाची दिशा निश्चित होईल, असे सुत्रांनी सांगितले.