खामगाव (जि. बुलडाणा) : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना, तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयच्या चांगलेच अंगलट आले. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी त्याचे मित्र घटनास्थळावरून फरार झाल्याने, बिचाऱ्या एकट्यावरच ‘नको रे बाप्पा’ म्हणत गजाआड होण्याची वेळ आली.स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेटजवळ रात्री उशिरा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलीस घटनास्थळी धडकले असता, रोहन संजय बामनेट (वय १८) चार मित्रांसह वाढदिवस साजरा करताना दिसला. पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. रोहनला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यासह चौघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. चौघांचा कसून शोध घेतला जात आहे.
तलवारीने केक कापत होता बर्थडे बॉय, तितक्यात पोलीस आले अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 10:32 AM