नागपूर : बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून बेछुट गोळीबार केला. गोळ्या गाडीवर लागल्याने जोशी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोरांनी एकामागोमाग एक अशा चार गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. ही घटना अमरावती आऊटर रिंग रोडवर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
महापौर संदीप जोशी वर्धा मार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच्या रसरंजन धाब्यावरील स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून १२ च्या सुमारास कुटुंबिय व आपल्या मित्रासह नागपूर शहराकडे परत येत होते. धाब्यावरून ७ गाड्या नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी फॉर्च्युनर गाडी चालवित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछुट गोळीवार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या.
दरम्यान, जोशी यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. या घटनेसंदर्भात संदर्भात जोशी यांनी लगेच शहर पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली. तसेच बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आ. विकास ठाकरे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनीता साहू, पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जोशी यांचे मित्रमंडळीही घटनास्थळी उपस्थित होते.
६ डिसेंबरला मिळाली होती धमकीसंदीप जोशी यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख मार्ग व बाजार भागातील अतिक्रमण काढण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्या दिशेने कारवाईलाही सुरुवात केली होती. यासोबतच नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी १०० तक्रार बॉक्स लावले होते. यात जोशी यांना एक निनावी धमकी पत्र आले होते. यात त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी ६ डिसेंबरला सदर पोलिसात तक्रारही दाखल केली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करीत होते.
हल्लेखोर होते मागावरचमहापौर संदीप जोशी हे रसरंजन धाब्यावर कुटुंबीयांसह गेल्यानंतर काही वेळाने दोघा संशयितांनी धाब्यावर येऊन महापौर जोशी गेले का? अशी विचारणा केली होती. त्यावरून हे दोघेही त्यांच्या मागावरच होते, हे स्पष्ट होते. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये ते आले असावेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या महिन्यातच भाजपाचे संदीप जोशी यांची महापौरपदी निवड झाली होती. जोशी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या हर्षला साबळे यांचा ७८ मतांनी पराभव केला. जोशी यांना १०४ मते मिळाली. तर साबळे यांना २६ मते मिळाली होती. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक ज्येष्ठ नगरसेवकांत रस्सीखेच सुरू होती. यावर तोडगा म्हणून महापौरपदी सत्तापक्षनेते संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना प्रत्येकी सव्वावर्ष संधी देण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला.