लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विक्रोळीत गुरुवारी सकाळी शिवसेनेचे उपशाखाप्रमुख चंद्रशेखर केशव जाधव (५५) यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. जमावाने हल्लेखोर तरुणाला पकडून बेदम चोप दिला आहे. त्यात हल्लेखोरही जखमी असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रोळी, कांजूरमार्ग परिसरातील पुनर्विकास प्रकल्प, त्यातील विविध कामांची कंत्राटे आणि वर्चस्वाच्या स्पर्धेतून संघटित गुन्हेगारी टोळीने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.जाधव हे मुलासोबत गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास टागोरनगर येथील साई मंदिरात दर्शनासाठी गेले असताना ही घटना घडली. ७.१० च्या सुमारास अभय विक्रम सिंग (२२) या तरुणाने त्यांच्यावर गोळी झाडली. ती जाधव यांच्या खांद्यावर लागली आणि ते खाली कोसळले. मुलाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोर अभयने आणखी चार गोळ्या झाडल्या आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.स्थानिक तरुणांनी अभयला पकडून चोप दिला. यात तोही जखमी झाला असून त्याच्यावरदेखील उपचार सुरू आहेत. तो इलाहाबाद येथील रहिवासी आहे. घटनेची वर्दी लागताच पोलीस तेथे दाखल झाले. जाधव यांना गोदरेज तर जखमी अभयला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी जाधव यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार अभयविरुद्ध हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.राजाश्रयाला असलेल्या संघटित टोळीच्या म्होरक्याचा हात?विक्रोळीतील म्हाडा किंवा अन्य शासकीय, खासगी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, त्यातील विविध कंत्राटे, लोकप्रतिनिधींच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विविध योजना आदींची जबाबदारी जाधव यांच्याकडे आहे. यापूर्वी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रसाद पुजारी याने जाधव यांना अनेकदा धमकावल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या हल्ल्यामागे लोकप्रतिनिधींच्या राजाश्रयाला असलेल्या भांडुपमधील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचाही हात असल्याचा संशय आहे. त्या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.हत्येची सुपारी : अभयकडून हस्तगत करण्यात आलेले पिस्तूल अद्ययावत असून त्याने हा हल्ला हत्येच्याचउद्देशाने केला. तसेच त्याला यासाठी हत्येची सुपारी देण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकड़ून वर्तविण्यात येत आहे. यामागे नेमके कोण आहे, एखादी टोळी आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
विक्रोळीत शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 6:00 AM