अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शूटर्सनी सिद्दिकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना म्हटलं होतं की, "मला गोळ्या लागल्या आहेत आणि मला वाटत नाही की, मी वाचू शकेन" हेच त्यांचे शेवटचे शब्द असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. गोळीबारानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांची तासभर चौकशी केली. यावेळी झिशान यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी झिशान यांना बाबा सिद्दिकी यांचं कोणाशी वैर होतं का? तुमचं कोणाशी वैर आहे का? त्यांना कोणी मारलं असं तुम्हाला वाटतं? तुमचा कोणावर संशय आहे का? असे प्रश्न विचारले आहेत.
पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक बॅगही सापडली असून त्यात एका आरोपीचं आधारकार्ड सापडलं आहे. पोलीस तपासात असं समोर आलं की, शूटर्स बाबा सिद्दिकी यांच्या घराची रेकी करण्यासाठी बाईक वापरत होते. काही दिवसांपूर्वी ते बाईकवरून पडले, त्यामुळे घटनेच्या दिवशी ते ऑटोने आले. बाईकसाठी आरोपी प्रवीण लोणकर याने हरीश निषाद याला ६० हजार रुपये दिले होते. पुणे येथून बाईक घेण्यासाठी ३२ हजार रुपये दिले होते. गोळीबार करणाऱ्यांनी घटनास्थळी बाबा सिद्दिकी यांची ४५ मिनिटं वाट पाहिली होती, असंही तपासात समोर आलं आहे.
रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
फरार आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. ही पथके यूपी, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये तपास करत आहेत. सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडली त्या ठिकाणापासून सुमारे २५० मीटर अंतरावर एक बॅग सापडली. या बॅगेत तुर्की मेड ७.६२ मिमीचं ऑटोमॅटिक पिस्तूलही होतं. या पिस्तुलने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळी झाडली असावी, असा अंदाज आहे. सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. धर्मराज कश्यप आणि हरीश कुमार निषाद, गुरमेल सिंह आणि प्रवीण लोणकर यांना अटक करण्यात आली आहे.