मुंबई-
मुंबई पोलिसांनी 'Bulli Bai' आणि 'सुल्ली डिल' अॅप प्रकरणात बंगळुरू येथून २१ वर्षी तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करुन त्यांची बोली लावून बदनामी करण्याचे प्रकार या अॅपच्या माध्यमातून घडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला होता. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही याबाबतचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देत तातडीनं चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत याप्रकरणात पहिली अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं असून संबंधित तरुण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाची माहिती आणि ओळख सांगण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला असून प्रकरणाची सखोल चौकशी अद्याप सुरू असल्याचं सांगितलं आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी अज्ञाता विरोधात आयपीसी आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही याप्रकरणात मुंबईल पोलिसांना पहिलं यश आलं असल्याचं ट्विट केलं आहे. तसंच प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख जाहीर केल्यास प्रकरणाच्या चौकशीला बाधा येऊ शकते, असं म्हटलं आहे. तसंच लवकरच संबंधित प्रकरणाच्या मूळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील सतेज पाटील यांनी दिलं आहे.