- अझहर अली
संग्रामपूर: नदीपात्रातून वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी वान नदी पात्रात गेलेल्या पलसोडा येथील कोतवालच्या अंगावर थेट वाळू माफियाने ट्रॅक्टर चढविला. यात कोतवालाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यातील कोलद शिवारात घडली.
प्राप्तमाहितीनुसार, वाननदी पात्रातून सर्रास अवैद्यरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक सूरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने टुनकी येथील तलाठी एस. एस. डाबरे, एकलारा येथील तलाठी डी. एस. बोडखे व पलसोडा येथील कोतवाल लक्ष्मण अस्वार तिघे कारवाई करण्यासाठी कोलद शिवारातील वान नदी पात्रात गेले. त्यांना अवैद्यरीत्या वाळूची वाहतूक करतांना ट्रॅक्टर दिसून आले. कोलद शिवारातील वान नदीच्या पुलावर कोतवालाने विना नंबरचा अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने दादागिरीने कोतवाल लक्ष्मण अस्वार याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून घटनास्थळावरून धूम ठोकली.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरीकांच्या मदतीने गंभीर अवस्थेत कोतवाल लक्ष्मण अस्वार यांना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथील डॉक्टरांनी कोतवाल लक्ष्मण अस्वार यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा तामगाव पोलीस ठाण्यात तलाठी डी. एस. बोडखे यांच्या फिर्यादीवरून खळद येथील ट्रॅक्टर चालक आरोपी संतोष पारीसे याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०७, ३०२, ३८९, ३५३, २१(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मृतक कोतवाल एकलारा येथील रहिवासीवाळू माफियाचा बळी ठरलेले मृतक संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील रहिवासी असून पलसोडा तलाठी कार्यालयावर कोतवाल पदावर कार्यरत होते.