राम शिनगारे, औरंगाबाद: दिवसासह रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगारांना चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी आल्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने पकडले आहे. या चारही आरोपींना अटक केली. या आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
भारत ऊर्फ जॉन शंकर तिर्थे, प्रकाश ऊर्फ बंटी साळीकराम शिंगाडे (दोघे, रा. जयभवानीनगर), अनिल ऊर्फ पिलेवान दादाराव आव्हाड ( रा. भारतनगर) आणि अभिषेक विष्णू शिंदे (रा. मुकुंदवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडीच्या विशेष तपास पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार संतोष भानुसे, नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गिते. अनिल थोरे, गणेश वाघ आणि शाम आढे यांचे पथक हद्दीत गस्तीवर असताना चारजण चोरीचा गॅस सिलिंडर, शेगडी विक्री करण्यासाठी जयभवानीनगर भागात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पकडले. तेव्हा त्यांच्याकडे गौतम अवचरमल (रा. एशियाड कॉलनी) यांच्या घरातील चोरीत चोरलेला मुद्देमाल आढळून आला.
एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला. यात १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडरसह इतर साहित्याचा समावेश आहे. आरोपींना ठाण्यात आणून अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चारही आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे निरीक्षक गिरी यांनी सांगितले.
घरफोड्यांचे अनेक गुन्हे- या चारही आरोपींच्या विरोधात घरफोड्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीतील अभिषेक शिंदे याच्या विरोधात चार गुन्हे विविध ठाण्यात नोंद असून, इतरांवरही चोरीच्या प्रकरणातीलच गुन्हे दाखल आहेत.