चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार थैलवा रजनीकांत यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईत भेट दिली. यावेळी, त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेटही घेतली. त्यामुळे, रजनीकांत यांची मुंबई भेट महाराष्ट्रात चर्चेची ठरली. आता, रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे. ऐश्वर्या यांच्या घरातील चोरीप्रकरणी तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चेन्नईमधल्या घरातून डायमंड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. या दागिन्यांची किंमत जवळपास ३.६० लाख रुपये असून २०१९ मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नात ऐश्वर्याने हे दागिने वापरले होते. हरवलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, अनकट डायमंड्स, अँटिक गोल्ड दागिने, नवरत्न सेट, अँटिक अनकट डायमंड आणि गोल्ड, आरम नेकलेस आणि बांगड्या यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात हे दागिने वापरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवल्याचं ऐश्वर्या यांनी सांगितलं. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी दागिने हरवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं, असे पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, एफआयआर कॉपीतील माहितीनुसार, ऐश्वर्या यांनी हे दागिने त्यांच्या लॉकरमध्ये ठेवले आणि घरकाम करणाऱ्यांना याविषयीची माहिती होती. घरकाम करणाऱ्या तीन जणांवर ऐश्वर्या यांनी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, ऐश्वर्याने अभिनेता धनुषसोबत लग्न केले होते, १८ वर्षे संसार केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटही घेतला होता. मात्र, कुटुंबीयांना समजूत घातल्यानंतर दोघांनी निर्णय बदलला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.