मुंबई - भारतात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र, शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या उकलीचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून, हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुद्धा गुन्हांच्या उकलीचे प्रमाणात खूपच कमी आहे. फक्त जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुंबईत मागील सहा महिन्यात १०८६ घरफोडीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. त्यापैकी फक्त ४२६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर घरे बंद करून गावी किंवा सहलीला निघून गेल्यानंतर चोरट्यांनी हेरून केले आहेत. २०१७ साली घरफोडीच्या २४०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी पोलिसांना फक्त १०४५ गुन्ह्यांचा उलघडा केला आहे. तर २०१६ मध्येही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. २०१६ मध्ये २५५२ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून ११७१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील आकडेवारी पाहता अर्ध्याहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले असल्याचे दिसून आले आहे.
मागील पाच वर्षात दोन अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार इतकी मालमतात घरफोडीतून चोरीला गेली आहे. त्यापैकी उघडकीस आलेल्या गुन्ह्यातून पोलिसांना फक्त ४८ कोटी ७० लाख ३८ हजार किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे. पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील फक्त १७.५ टक्के मालमत्ता हस्तगत केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांना पोलिसांनी दिली आहे.