देवेंद्र पाठक, धुळे: धुळे शहरासह साक्री तालुक्यातील भाडणे गावात चोरट्यांनी हातसफाई करून लाखोंचा ऐवज लांबविला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यातील घटना
शहरातील हमाल-मापाडी परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई केली. आई-वडील टेरेसवर झोपलेले असताना घराच्या दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून लोखंडाचे कपाट आणि लाकडी टेबल उचकटून चोरट्याने रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. भूषण बाबूलाल गोलर यांनी फिर्याद दाखल केली, तसेच या परिसरात राहणारे जितेंद्र यादव फरताडे यांच्याही घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटातील रोकड लंपास केली. दाेन ठिकाणच्या झालेल्या घरफोडीत ५५ हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून ८६ हजारांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांची नोंद आझादनगर पोलिसांत करण्यात आली आहे.भाडणे गावात चोरट्यांची हातसफाई
साक्री तालुक्यातील भाडणे गावातील देसले वाड्यात चोरट्याने घरफोडी करत कपाटातील रोकडसह १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दाागिने लंपास केले. देसले वाड्यात राहणारे भरत मधुकर देसले व त्यांचे भाऊ किशोर मधुकर देसले यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोकड व दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी भरत देसले यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.