जळगाव : सर्वसामान्यांच्या घरात चोरी व घरफोड्यांचा छडा लागत नसताना या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांच्याच घरापर्यंत चोरांचे हात पोहोचू लागले आहेत. जळगावच्या वाहतूक पोलिसाच्या घरातून मध्यरात्रीच्या सुमारास चार मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत.
शिवाजी नगरातील राधाकृष्ण नगरात ही घटना घडली आहे. हेमंत रमेश राजेमहाडीक या वाहतूक पोलिसाच्या घरात ही चोरी झाली. या प्रकरणी गुरुवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने महाडीक यांच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आहे.
चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटलेहॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात गप्पा मारण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९, रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना धाक दाखवून त्यांच्याजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.