मंगेश कराळे
नालासोपारा :- घरफोडी, चोरी करणाऱ्या ४ आरोपींना २४ तासाच्या आत पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
वसई फाट्याच्या ए के इंडस्ट्रीयल इस्टेटमधील परमार टेक्नो सेंटरमध्ये १ जानेवारीला रात्री घरफोडी झाली होती. चोरट्याने बंद गाळ्याच्या शटरची कडी तोडून त्यावाटे प्रवेश केला होता. तेथून चोरट्याने कटिंग व्हील, ग्राईडिंग व्हील, फ्लेप डिस्क, वेल्डिंग रोड, ऑइल पेंट कलर असा एकूण २ लाख ६८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाला चोरी करून नेला होता. मिराज खान (३३) यांनी ३ फेब्रुवारीला तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य त्या सुचना दिल्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे यांनी टीमसह गुन्हयाचे घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळावरील व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्याव्दारे आरोपी बाबत माहिती घेतली. आरोपी हे घरफोडी चोरी करुन भिवंडीला गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. आरोपींचा तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेऊन मेराज अली अन्सारी (३२), अब्दुल रेहमान शेख (३०), रामचंद्र किसन भंडारवार (३०) आणि मोहमद खलील अन्सारी (३६) यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडे तपास केल्यावर त्यांनीच गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून गुन्हयातील गेलेला १००% माल हस्तगत केला. आरोपीनी गुन्हा करण्याकरीता वापरलेला आयशर टेम्पो असा एकुण १२ लाख ६८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, नामदेव ढोणे, संतोष खेमनर यांनी पार पाडली आहे.