मुंबई : कर्ज परत देण्यात अपयश आल्याच्या निराशेत सौरभ पितळे (३०) या व्यावसायिकाने बारा पानी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांनी चार मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.पितळे हे पत्नी आणि मुलासह मालाड पश्चिम परिसरात राहत होते. त्यांचे बांगुरनगरमधील विजय इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये इंजिनीअरिंग वर्कशॉप आहे. लॉकडाऊन दरम्यान फारसे काम नव्हते. त्यामुळे कामासाठी घेतलेल्या २५ लाखांचा डोंगर डोक्यावर होता. त्यामुळेच ते तणावात होते. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी काही कामानिमित्त बाहेर जाऊन आले आणि त्यानंतर साडेसात ते आठच्या सुमारास त्यांनी त्याच गच्चीवरून उडी मारली. तो आवाज ऐकून सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पितळे त्यांना दिसले. याबाबत समजताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पितळे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
‘नोट’मध्ये देणेकऱ्यांची नावे : पितळे यांनी कार्यालयात एक सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये देणेकऱ्यांची नावे लिहली आहेत. त्यानुसार त्यांना जवळपास २५ लाखांचे कर्ज होते. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे उघड झाले. त्यांच्या भावाचा जबाब पोलिसांनी घेतला असून याबाबत त्यांची कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनीदेखील या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.