कल्याण : आपल्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या करणारा व्यावसायिक दीपक गायकवाडला पोलिसांनी शनिवारी अटक केली. दीपक हा आपली पत्नी अश्विनीला माहेरून पैसे आणण्याकरिता दमदाटी करीत होता. तसेच पैसे आणले नाही तर मुलासह तुला ठार मारीन, अशी धमकी देत होता, ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दीपकने पत्नीला दिलेली धमकी खरी केली. निर्दयी दीपकला आमच्यासमोर आणा. ताेपर्यंत अश्विनी आणि आदिराजचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातलगांनी नकार दिला होता. तर दीपकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी केली.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नंबर तीनमध्ये ‘नानूस वर्ल्ड’ या दुकानाचा मालक दीपक गायकवाड आपली पत्नी व मुलासह राहत होता. दीपकवर कर्ज झाले होते व त्या कर्जाच्या बोजामुळे ताे मुलाची आणि पत्नीची हत्या करून पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दीपकला ताब्यात घेतले. दीपकची पत्नी अश्विनीचे कुटुंबीय कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शुक्रवारी रात्री जमले होते. या ठिकाणी सात वर्षांचा आदिराज आणि त्याची आई अश्विनी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
आम्ही दीपकला वेळोवेळी पैसे दिले. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये दिले होते. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या मुलाला मारून टाकणार, अशी धमकी दीपक द्यायचा. अश्विनीचा छळ करण्यात दीपक गायकवाड, आकाश सुरवडे, ज्योती दर्शन बागुल, सुनीता गायकवाड हे लोक सामील आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा. - विकी मोरे, अश्विनीचा भाऊ
कोट्यवधींचे कर्जआरोपी दीपक गायकवाड याची कल्याणमध्ये नानूस वर्ल्ड ही खेळण्याची दुकाने विविध ठिकाणी आहेत. त्याच्या डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. पैशाच्या कारणावरून तो पत्नीला घटस्फोट देणार होता. यावरून त्यांचे वाद सुरू होते. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती. शुक्रवारीही त्यांचे भांडणे झाले. त्यावेळी पत्नी अश्विनीने त्याची काॅलर पकडली. त्याचा राग दीपकला आला. त्याने रागाच्या भरात तिची गळा दाबून हत्या केली.