विवाहबाह्य संबंधातून आदर्श नगर परिसरात एका ४६ वर्षीय व्यापाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यपाऱ्याच्या गर्लफ्रेंडने आई आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याचं उघड झालं आहे. एवढंच नव्हे तर या तिघांनी प्रियकराच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरून राजधानी गाडीतून गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. प्रेयसी फैसल (२९), प्रेयसीची आई शाहीन नाझ (४५) आणि होणारा नवरा जुबेर (२८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस अधिकारी वैजयंता आर्या यांनी दिली. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली वीट आणि चाकू हस्तगत करण्यात आले आहेत. तर मृतदेहाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्येची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. मृत व्यापाऱ्याचं नाव नीरज गुप्ता आहे. तो मॉडल टाऊन येथे राहत होता. त्याचा करोल बागमध्ये बिजिनेस होता. त्याचं ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. नीरज यांच्या पत्नीने १४ नोव्हेंबरला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नीरजच्या बेपत्ता असण्यामागे फैजल नावाच्या प्रेयसीचा हात असल्याची शंकाही तिने व्यक्त केली होती. फैजल ही नीरजच्या ऑफिमध्ये काम करायची आणि तिच्यासोबत नीरजचे अवैध संबंध होते. पोलिसांनी जेव्हा फैजल हिची चौकशी केली त्यावेळी तिने नकार दिला. मात्र, तिच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरुन पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच फैजल हिने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला. फैजल आणि नीरजमध्ये यांच्यात गेल्या १० वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, फैजलच्या घरच्यांनी तिचं दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवलं. जुबेर नावाच्या मुळाशी तिचा साखरपुडाही झाला. जुबेर हा राजधानी ट्रेनच्या पँट्रीमध्ये काम करतो. फैजलने दिलेल्या दग्यामुळे नीरज नाराज होता. नीरज याने १२ नोव्हेंबरला रागाच्या भरात फैजलच्या घरी जावून तिला मारहाण केली. त्यावेळी तिची आई आणि जुबेर तिथेच होता. या तिघांनी मिळून नीरजच्या डोक्यात वीट घातली आणि पोटात तीनवेळा चाकू भोसकून हत्या केली.
इतक्यावरच न थांबता हत्या केल्यानंतर फैजलने जुबेरच्या मदतीने नीरजच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये भरले. जुबेरने ते निजामुद्दीन स्टेशनला नेले. त्या स्टेशनवरून गोव्याला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधील ट्रेनच्या पँट्रीमध्ये ठेवून मृतदेह प्रवासात लागलेल्या गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिला.