छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आपल्या स्वत:च्या हत्येची सुपारी आपल्याच कामगाराला दिल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने आपल्या कर्मचाऱ्याला स्वत:वर गोळी झाडण्याची सुपारी दिली. हत्येचे गूढ उकलल्याचा दावा करत पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबिकापूर शहरातील मनेंद्रगड रोडवरील सुभाष नगरमध्ये ही घटना घडली. येथे राहणाऱ्या २५ वर्षीय अक्षत या तरुणाचा मृतदेह २१ ऑगस्ट रोजी शहरालगतच्या चाथिरमा जंगलात कारमध्ये आढळून आला होता. त्याच्या शरीरावर पिस्तुलाच्या गोळीच्या खुणा होत्या.
यूट्यूबवरील व्हिडीओमुळे पोलिसाची झाली फसगत, अलिबागमध्ये प्लॉट दाखवून चार लाख लंपास
या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने गोळीबार केल्याची कबुली दिली. त्याच्या मागावरच पोलिसांना इतर पुरावे सापडले. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, अक्षतने (मृत) त्याला गोळी मारण्यासाठी पैसे आणि दागिने दिले होते.
मयत अक्षत अग्रवाल हा २० ऑगस्ट रोजी सायंकाळी फिरायला जात असल्याचे सांगून त्याच्या कारने घरातून निघाला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणे झाले. काही वेळाने घरी येत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ६.३० नंतर त्याचा मोबाईल बंद लागला. त्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला. शोध घेऊनही तो कुठेच सापडला नाही, त्यामुळे त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनीही त्याचा शोध सुरू केला.
संशयाच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सकाळी भगवानपूर येथील जमीन व्यापारी भानू बंगाली नावाच्या तरुणाला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी चथिरमा जंगलात असलेल्या त्याच्या कारमधून अक्षत अग्रवालचा मृतदेह बाहेर काढला. या तरुणाने खुनाची कबुली दिली.
बुधवारी सकाळी ८ वाजता घटनेची माहिती मिळताच सुरगुजा पोलीस अधीक्षक योगेश पटेल, सीएसपी गांधीनगर टीआय प्रदीप जयवाल, फॉरेन्सिक तज्ज्ञ कुलदीप कुजूर आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपी तरुणाकडून प्रत्येकी ५०० रुपयांच्या सुमारे १०० नोटा आणि दागिने सापडले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींकडून मयत अक्षतची सोनसाखळीही जप्त करण्यात आली आहे. अक्षतने त्याला गोळी मारण्यासाठी ५० हजार रुपये आणि दागिने दिले होते. यानंतर त्याच्यावर गोळी झाडली. आरोपी संजीव मंडल उर्फ भानू हा देखील बंगाली जमीन दलाल आहे. अंबिका स्टील येथील अक्षत अग्रवाल यांच्या शोरूममध्ये तो आधी कर्मचारी होता.