दिल्ली - मंगोलपुरी रेल्वे स्टेशनजवळ एक भयंकर दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी रोहिणी येथील रहिवासी असलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीने २ मुलींसह ट्रेनसमोर उडी घेतली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या माहितीनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी पोस्टमोर्टमला पाठवले. रात्री उशिरा या महिलेची ओळख पटली.
तपासात समोर आले की, महिलेने घरी सुसाईड नोट लिहून मुलींसह बाहेर निघाली होती. सुसाईड नोटमध्ये मृत्यूला कुणाला जबाबदार धरू नये असं म्हटलंय. मात्र मृत महिलेच्या कुटुंबाने जावई आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी हुंडाबळी प्रकरणी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. मृत महिलेचं नाव दीपा जैन होतं. दीपा आणि पती अंतरिक्ष जैन यांना ६ आणि ४ वर्षाच्या दोन मुली आहेत.
अंतरिक्ष हा प्लायवूड व्यापारी आहे. बुधवारी सकाळी ७.३० वाजता दीपा तिच्या दोन मुलींसह घरातून बाहेर पडली. अंतरिक्षला दीपाची सुसाईड नोट सापडली. ज्याप दोन मुलींसह आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता. अंतरिक्षने तात्काळ पत्नी आणि मुलींचा फोटो ट्विट करत पोलिसांना माहिती दिली. पत्नी आणि मुलींचा शोध घेण्याची मागणी केली. पोलिसांच्या निर्देशानुसार अंतरिक्षने विजय विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तर सकाळी ११ च्या सुमारास रोहिला रेल्वे पोलिसांना मंगोलपुरी रेल्वे स्टेशनजवळ नवी दिल्ली एक्सप्रेससमोर एक महिला आणि २ मुलींनी उडी घेतल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे शक्य नव्हतं. रात्री ९ च्या सुमारास महिला दीपा जैन आणि तिच्या मुली असल्याचं समोर आले. पोलिसांनी दीपा जैनच्या घरातून सुसाईड नोट जप्त केली. दीपा मूळत: राजस्थानच्या जयपूर येथे राहणारी होती. शुक्रवारी दीपाच्या घरच्यांना याबाबत माहिती देण्यात आली.
दीपा आणि अंतरिक्ष यांचं २०१५ मध्ये लग्न झाले होते. लग्नाला ७ वर्ष पूर्ण व्हायला १ दिवस बाकी होता. त्यामुळे या प्रकरणाची माहिती एसडीएम यांना देण्यात आली. दीपाच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार, अंतरिक्ष आणि त्याच्या घरचे हुंड्याच्या मागणीवरून मुलीचा छळ करायचे. एसडीएमच्या आदेशावरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी पोलिसांनी तिन्ही मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून नातेवाईकांना मृतदेह सोपवला.