सचिन राऊत
अकोला : नवीन अवजड वाहनांच्या पासिंग करिता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले उच्च दर्जाचे रिफ्लेक्टर लावण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र बनावट तयार करून शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीची फसवणूक करणाऱ्या व परिवहन विभागाचा कोट्यवधींचा महसूल लुटणाऱ्या सोलापुरातील मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणातील सुत्रधारास अटक केली असून या आरोपीने बनावट वेबसाईटच्या माध्यमातून मोठे रॅकेटच सुरू केल्याची माहीती आहे़
सोलापूर येथील रहिवासी आरोपी अक्षय सुरज डुडू याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार कार्यरत असलेल्या व नियुक्त केलेल्या कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून त्याच वेबसाईटच्या आधारे वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा गाेरखधंदा सुरू केला होता़ या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४१९, ४२०, ४०८ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता अक्षय सुरज डुडू याने बनावट वेबसाईट तयार करून त्याआधारे बनावट प्रमाणपत्र तयार करून उच्च दर्जाच्या परावर्तक टिप्स म्हणजेच रिफ्लेक्टर लावण्याच्या नावाखाली हेराफेरी सुरु केली हाेती़या माध्यमातून त्याने शासनाला काेट्टयवधी रुपयांना चुना लावत संबंधित कंपनीचीही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे़ त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या आरोपीस अटक केली आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवालीचे ठाणेदार सुनील वायदंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे, विजय मुलनकर, दिनेश शिरसाट, आतिश बावस्कर, पाेलिस निरीक्षक विजय नाफडे, आशिष आमले, गोपाल डोंगरे यांनी केली़
रिफ्लेक्टर लावण्याचा सपाटासुरक्षेच्या दृष्टीने नवीन अवजड वाहनांना परिवहन विभागाच्या नियमानुसार रीफ्लेक्टर लावून त्यानंतर प्रमाणपत्र देण्यासाठी मेसर्स अडव्हान्टेक असाेसीएटस एलएलपी ही कंपनी नियुक्त केलेली आहे़ मात्र साेलापूरातील आराेपीने या कंपनीच्या समांतर दुसरी वेबसाईट तयार करून बोगस प्रमाणपत्र तयार करून रिफ्लेक्टर लावण्याचा सपाटाच सुरु केला हाेता़ हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपीस अटक केली आहे़