डोंबिवली: चोरलेल्या मोबाईलचा पासवर्ड टाकून त्यातील फोन पे द्वारे नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्या चोरट्याला टिळकनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. चंदनसिंग सिसोदिया हे त्यांच्या ठाकुर्लीतील ९० फूट रोडवर असलेल्या चहाच्या दुकानात असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांचा ८ हजार रूपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना ३० मे ला घडली होती.
सिसोदिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. सिसोदिया यांनी मोबाईल फोनचा पासवर्ड १ २ ३ ४ असा साध्या पद्धतीने ठेवला होता. त्यामुळे एक-दोन प्रयत्नातच चोरट्याकडून मोबाईल फोनला असलेले लॉक उघडले गेले. मोबाईलमधील फोन पे ला देखील तोच पासवर्ड असल्याने त्याआधारे चोरट्याने घरडा सर्कल येथील मोबाईल दुकानामधून २६ हजाराचा नवीन मोबाईल खरेदी केला.
या गुन्ह्याच्या तपासकामी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार कदम यांनी पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलिस हवालदार बाबुराव हांडे, पोलिस नाईक संदीप सपकाळे, संदीप भोये, अजित सिंग रजपूत यांचे पथक नेमले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने गुन्हयात चोरीला गेलेला मोबाईल वापरणाऱ्या मुंब्रा येथील व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने संबंधित मोबाईल मुंबई, मशिद बंदर, येथून खरेदी केल्याचे सांगितले.
मशिद बंदर येथील दुकानदारास विचारणा केली असता, त्याने मोबाईल फोन हा भिवंडी येथील एका विक्रेत्याकडून घेतल्याचे सांगितले. भिवंडी येथे तपास केला असता सराईत गुन्हेगार शहनवाज उर्फ शाणू फैयाज शेख वय ३० वर्ष रा. नई बिल्डिंग, भिवंडी याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करून चोरलेला मोबाईल आणि त्याचा पासवर्ड वापरून नवीन खरेदी केलेला मोबाईल असा एकुण ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीचा घडलेला प्रकार पाहता आपल्या मोबाईलला कॉमन पासवर्ड, साधा पासवर्ड ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.